'दररोज थोडसे, सुरु कर, बस्स!' ( हा मंत्र वापरा आपल्या आयुष्यात संधी निर्माण करा. )

 काही वर्षांपूर्वी 'भाग मिल्खा भाग' हा चित्रपट पहिला आणि खूप भारावून गेलो होतो. मिल्खा सिंघ यांचा संघर्ष, त्यांचे समर्पण त्यांची कठोर मेहनत व त्यांचा 'सामान्य माणूस ते असामान्य व्यक्तिमत्व' हा सर्व प्रवास अविश्वसनीय, अचंबीत करणारा. चित्रपट पाहताना अनेकदा श्वास रोखले गेले, कारण काय तर मनात सुरु असलेली खलबते "यार इतकी मेहनत घेणे मला जमेल का?, कठीण आहे"


खर सांगू तर हा चित्रपट पाहून मी कमालीचा अस्वस्थ झालो होतो. चित्रपट अप्रतिम, अवर्णनीय…त्याबद्दल काहीच वाद नाही. पण चित्रपटातून प्रेरणा घ्यायची म्हटले तर "बापरे इतकी मेहनत, इतके समर्पण मला जमेल का? हाच विचार डोक्यात.


खरच अशी माणसे असतात? कसे इतके ते जिद्दीने पेटून उठून आपले ध्येय साध्य करतात?


चित्रपटातील काही प्रसंग म्हणजे, मिल्खा सिंघ आर्मी मधे असताना जेव्हा एका सराव स्पर्धेत धावतात, ते एका दुधासाठी. नंतर पुढे एका स्पर्धेत धावतात, ते इंडिया हे नाव लिहिलेला कोट मिळविण्यासाठी. लहानपणापासूनच जीवन जगण्यासाठी त्यांना कमालीचा संघर्ष करावा लागला. आम्हाला लहानपणापासून सर्व काही सुरळीत मिळाले म्हणून कदाचित, जे नाही ते मिळवण्याची पराकोटीची जिद्दच कधी निर्माण झाली नाही.


पुढे जाऊन स्वप्ने तरी काय विशेष असतात हो … चांगले करियर करावे…. चांगले पैसे कमवावे … लग्न करावे … घर घ्यावे … अशीच काहीशी कॉमन. या सर्व प्रवासात असे नाही की आपण कधी संघर्ष करीत नाही, मेहनत घेत नाही …. कमी जास्त प्रमाणात ते थोडेफार असतेच.


या जडणघडणीत अनेक प्रेरणादायी कथा आपण ऐकतो, पाहतो …. त्याने असे केले … तिने असे केले. आज सचिन बघा कुठे, अमिताभ बच्चन पहा कुठे वेगरे वेगरे. बरे हे असामान्य लोक जोपर्यंत दूरचे असतात तोपर्यंत सर्व ठीक असते. पण आपल्यातीलच एक, आपल्या आजूबाजूला असणारा, आपल्याच रोजच्या ओळखीतला, कोणी 'सामान्य ते असामान्य' असा प्रवास करतो तेव्हा खूप त्रास होतो. थ्री इडीयट मधील तो डायलॉग आहे ना "दोस्त जब फेल हो तो बुरा लगता है, पर जब वो फर्स्ट आये तो बहुत बुरा लागता है".


खरंतर त्यांच्या होणाऱ्या प्रगतीचा त्रास नसतो, तर तो त्रास तुला मला ही संधी होती - आहे व तू मी काही केले नाही हे मनाला बोचायला लागते याचा असतो. दुसऱ्याची रेष छोटी करण्यापेक्षा तुझी रेष तूच स्वतः मोठी कर ना, हा विचार मनाला यावेळी प्रेरणा देतो.


आयुष्य म्हटले की स्वप्न, ध्येय, प्रॉब्लेम्स, संघर्ष हे आलेच. यात सातत्याने प्रेरणा ही लागणारच … मग काही पुस्तके, तर कधी प्रेरणादायी व्यक्तिमत्व यांना भेटणे, भाग मिल्खा भाग - लगान यासारखे चित्रपट पाहणे हे येतेच, असे म्हणू आपल्याकडून हे होतेच. आज आपल्या आजूबाजूला असे अनेक कोर्सेस देखील आहेत जे आपल्याला मोटीवेट करतात, आपल्याला प्रेरणा व दिशा देतात.


बर या प्रकारचे कोर्सेस आपल्याला शिक्षण देतात म्हणजे काय तर आपल्याला एक दृष्टीकोन देतात, बाकी करायचे असते ते आपल्यालाच. मग आता वर पाहिलेला चित्रपट, त्यातील लर्निंग लेसन्स, त्यातून मिळालेली प्रेरणा व आपल्या जीवनातील रोजचे छोटे मोठे संघर्ष याची सांगड कशी घालायची? कारण आपल्यालाही मोठे व्हायचे आहे, काहीतरी करून दाखवायचे आहे. विचार करता करता मला काहीसे आठवले, अचानक एक मंत्र आठवला. तो म्हणजे "दररोज थोडसे"


नाव एवढेसे पण त्यात मला खूप मोठा अर्थ सापडला "दररोज थोडसे"

काय आहे तो अर्थ हे जाणण्यासाठी पुढे वाचा.


एकदा एका कार्यक्रमात तळवलकर जिमन्याशियमचे सर्वेसर्वा ८० वर्षाचे फीट आणि फाईन ‘मधुकर तळवलकर सर’ बोलत होते. अचानक ते बोलता बोलता माझ्याकडे बोट करून सर्व प्रेक्षकांसमोर म्हणाले "बघा हा मी काय काय सांगतो ते नीट लक्षात घ्या. आता हा आपला उल्हास आहे ना उल्हास. त्याने फक्त दररोज एवढेसे! करायचे की रोज दहा दंड व पंधरा उठाबश्या मारायच्या, असे रोज फक्त १५ मिनिटे, असे वर्षभर ३६५ दिवस करायचे. आता ३६५ दिवस गुणिले रोजचे दहा दंड व पंधरा उठाबश्या, करा बघू गणित. मला सांगा हे असे रोज "दररोज थोडसे" केल्यावर आपला उल्हास कसा दिसेल. दिसेल की नाही एकदम फीट आणि फाईन.


तळवलकर सरांचा तो माझ्यासाठीचा संदेश यावर मी रोज काम करतो आहे व आठवड्याला सरांना मोबाईल एस एम एस ने अपडेटही करतो आहे. सरांचा त्यानंतर कधी कधी फोन येतो व असेच करत रहा हा उल्हास "दररोज थोडसे" हा सल्लाही येतो. मला आता त्यांच्या त्या दोन मिनिटांच्या फोनची इतकी सवय झाली आहे की, मी आता जे रोज "दररोज थोडसे" करतो ते त्यांच्या त्या दोन प्रेरणादायी शब्दांसाठी.


या "दररोज थोडसे" मंत्रा मध्ये अनेक गोष्टी दडलेल्या आहेत हे मला त्यावर काम करताना जाणवले.


यामध्ये चुका करण स्वस्त पडतं कारण, स्पर्धा ही स्वतःची स्वताशीच असते. बर यात तुमची एखादी गोष्ट फसली तर ती कल्पना फसलेली असते, तुम्ही आम्ही नाही. आपली खिलाडूवृत्तीही वाढते … कारण , तुम्ही आम्ही कितीही चांगले असलो, तरी कधी कधी नावासमोर भोपळा हा लागतोच.


प्रसिद्ध गोल्फ खेळाडू टायगर वूड्सला एकदा एकाने विचारले की, "तू जसा शॉट मारतोस ना, मला तसा शॉट मारायचा असेल तर काय करावे लागेल?" त्यावर टायगर वूड्सला त्याला म्हणाला की, "काही विशेष नाही, मी जसा शॉट मारतो ना तसा ‘दिवसातले १८ तास’ तसा शॉट मारण्याचा सराव करायचा बस्स, असे फक्त पुढील दहा वर्षे इतकंच.


नारायण मूर्ती एकदा असे म्हणाले होते "एका रात्रीत किमया करण्यासाठी मला २५ वर्ष लागली."


मित्रांनो आणि मैत्रिंनीनो, कधी कधी आपल्याला असे वाटते की "हे मला ३ - ४ वर्षापूर्वी कळले असते तर, हे त्यावेळी सुरु केले असते तर. पण मित्रांनो आणि मैत्रिंनीनो, आयुष्य हे असंच असत, तुम्हाला मला संधी मिळते तेव्हाच तुम्ही आम्ही सुरवात करतो."


"दररोज थोडसे" हा मंत्र आपण वापरला तर आपण स्वतःहून आपल्या आयुष्यात संधी निर्माण करतो. तो एक सुविचार आहे ना “Luck is the Meeting of Opportunity and Preparation”


सर्वात शेवटी सांगायचे म्हणजे या मंत्राला आणखी एका मंत्रांची जोड द्यावी लागते तेव्हा तो फळतो.


तो मंत्र म्हणजे - "सुरु कर, बस्स!"


- उल्हास कोटकर 9821033736






1 comment:

Unknown said...

खूपच छान संदेश सर...धन्यवाद नक्कीच दररोज सराव सुरू करणार...व्यायाम,वाचन,वक्तृत्व....किती..विशेष आहे सर सहज लिहिले तिन्ही शब्द...तेही...'व'वरूनच आले.....