आपल्या स्वतःमधील आत्मविश्वासाला वाढवा.

पर्वा एक मित्र मला भेटला व म्हणाला "आयुष्य जे काल होते, ते आज नाही आहे. खूप टफ टाइम चालू आहे. कालपर्यंत जे होत होते, ते आज होत नाही आहे, परिस्थिती सातत्याने बदलत आहे. कोणत्याही गोष्टीत सातत्य नाही आहे." अतिशय तणावग्रस्त मनस्थितीत तो होता. 


त्याचे म्हणणे एका अर्थी खरेच होते. आज जग झपाट्याने बदलत आहे, मोठ मोठे बदल सातत्याने होत आहेत. आपल्या आयुष्य जगण्यात सातत्य नसले तरी एका गोष्टीत सातत्य नक्कीच आहे ते म्हणजे "बदल-Change " आणि याची आपणा सर्वाना कल्पना आहे. 


आज शिक्षण पद्धतीमध्ये सातत्याने बदल होतो आहे. करियर ठरवण्यामध्ये देखील खूप बदल होत आहेत. एका कार्यक्रमात मी एका मुलीला विचारले "तुला पुढे काय बनायचे आहे? ती म्हणाली "डॉग ट्रेनर." आतापर्यंत 'मी डॉक्टर होणार', CA होणार असे ऐकले होते … थोडक्यात काय तर करियर अनेक अंगानी बदलत आहे. 


हे सर्व बदल एकाच गोष्टी मुळे घडत आहेत … ते म्हणजे टेक्नोलोजी … हे मूळ कारण आहे या सर्व बदलांसाठी. 


मित्रांनो आपले आयुष्य म्हणजे एक थांबलेले पाणी आहे व त्यात जर कोणी एक दगड फेकून मारला कि, ज्या प्रमाणे पाण्यावर तरंग निर्माण होतात, तसे काम टेक्नोलोजी आपल्या आयुष्यात आज करत आहे. या उदाहरणा प्रमाणेच एक दगड जर आपण टाकला आपल्या थांबलेल्या आयुष्यात, शांत आयुष्यात की लगेच बदल घडायला सुरु. एक दगड पडल्यानंतर जे बदल सुरु आहेत, त्यात रोज नवनवीन दगड पडत जात आहेत. प्रत्येक १८ महिन्यात त्या दगडाची साईज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुढील १०० वर्ष तरी या गोष्टीला अंत नाही व हे सातत्याने घडत जाणार आहे. 


ज्या ज्या वेळी नवीन दगड पडणार त्या त्या वेळी तुम्हाला मला बदलावेच लागणार आहे. आपल्याला नवीन अपडेट ज्ञान घ्यावेच लागणार आहे. तुम्हाला मला कामाची नवीन पद्धत आणावीच लागणार आहे. तुम्हाला मला नवनवीन कौशल्य आत्मसात करावेच लागणार आहे. तुम्हाला मला आपली प्रवृत्ती बदलावीच लागणार आहे. यातून एक गोष्ट नक्कीच होणार आहे … ते म्हणजे आपल्याला सातत्याने बदलावेच लागणार आहे. कारण हा दगड पडण्याचा कार्यक्रम बंद राहणार नाही. याचाच अर्थ तुमच्या माझ्या आयुष्यात शांतता नावाची गोष्ट कधीच नसणार आहे. 


यामुळे होते काय आहे की, अनेक लोक आपल्या भविष्याबद्दल भयभीत होत आहेत. "माझे पुढे कसे होणार?, माझ्या मुलांचे कसे होणार?, माझ्या आयुष्याचे काय होणार? काही थोड थोडके जण आहेत, जे त्यांच्या आयुष्यात शांत आहेत, आनंदी आहेत …. बाकी मोठ्या प्रमाणात अशी लोकसंख्या आहे जी आपल्या भविष्या बद्दल भयभीत आहेत, प्रचंड तणावाखाली आहेत. अनेक लोक तर या विचारात आहेत की, हे जे झपाट्याने बदल होत आहेत हे सर्व थांबणार कधी. 


"कारण, मी काही रोज स्वताला सारखा बदलू शकत नाही आहे. मी रोज नवीन ज्ञान घेऊ शकत नाही आहे. रोज मी माझी जी क्षमता आहे, त्यात बदल आणू शकत नाही आहे. रोज रोज नवीन सवयी, नवीन विचार मी बदलू शकत नाही आहे." 


"मी आता थकलो आहे आणि आज मी या परिस्थितीत आहे की, मी माझ्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही आहे. मला वाचन करायला सुद्धा वेळ नाही आहे. मी फक्त धावतो आहे …. माझे टार्गेट साध्य करण्यासाठी. माझ्या आयुष्यात सध्या खूप त्रास सुरु हे. कुछ भी स्टेबल नजर नही आ रहा है."


प्रत्येक गोष्टीचा वेग वाढला आहे. टेक्नोलोजी मधील हे बदल रोज आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर परिणाम घडवून आणत आहेत. आता हे बदल सूर्याच्या किरणां प्रमाणे असतात, जे आपण डोळ्याने पाहू शकत नाही. तुम्ही ते पाहण्याचे प्रयत्न करू लागलात, तर तुम्ही आंधळे होऊ शकता. तुम्ही प्रयत्न केले तरी ते तुम्हाला सहज दिसणार नाहीत.


आजूबाजूला जे झपाट्याने बदल घडत आहेत त्यामुळे अनेक नवीन गोष्टी तुमच्या माझ्यावर आदळत आहे. यामुळे एक खूप मोठा गोंधळ निर्माण होत आहे व यात आपला आत्मविश्वास हलत आहे. या अशा अशांत वातावरणाने आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. अनेकांना यामुळे अनेक हेल्थ प्रोब्लेम निर्माण होत आहेत व ते प्रचंड तणावाखाली वावरत आहेत. 


मागील २०० वर्षात जितके शोध नाही लागले तितके शोध मागील ५ वर्षात लागले आहेत आणि हा प्रत्येक शोध आपल्या आयुष्यात घुसखोरी करत आहे व आपल्याकडे थांबून पाहायला वेळच नाही आहे. माझे पुढे काय होईल …? या अशा विचारांचा गोंधळ, सातत्याने वाढत जाणारी भीती, या सर्वाचा आपल्या पर्सनल आत्मविश्वासावर घाव पडत आहेत. 


तरीसुद्धा आपण सकाळी लवकर उठतो आहे, धावतो आहे, काहीतरी मिळविण्याच्या जिद्दीने अंधाधुंद पळतो आहे. कारण आपल्याला स्वताला वाचवायचे आहे. मग आपण विचार करतो की, कधी मिळेल मला शांती? कधी मिळेल मला चैन? … कधी मला माझ्या व्यायामासाठी वेळ मिळेल?, कधी मला माझ्या कुटुंबासाठी वेळ देता येईल?, कधी मला वेळ मिळेल माझ्या स्वताच्या विकासासाठी.


या सर्व बदलामध्ये मग आपण मोठ्या आशेने पाहतो आहोत आपल्या राजकारण्यांणकडे. 'तुम्ही काही तरी करा व आम्हाला वाचवा.' लोकांना असे वाटते की, हे जे सर्व बदल घडत आहेत, या सर्व गोष्टींनी जो आपला पर्सनल आत्मविश्वास हलत आहे, त्यात आपल्याला आपले राजकारणी व सरकार मदत करेल. अच्छे दिन आयेंगे … 


मोठ्या संखेने काही लोक अशी आहेत, जे सरकारकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. सरकार आपल्याला नोकरी देईल, सरकार आपली काळजी घेईल. मोठ्या प्रमाणात असलेली हे लोकसंख्या सरकारला सांगते की, अशी काही तरी पॉलिसी आणा, जेणेकरून आमचे हे सर्व प्रोब्लेमच दूर होतील. काही थोड थोडके सोडले तर मोठ्या प्रमाणत जे राजकारणी आहेत ते सर्व सामान्य माणूसच आहेत, ते क्रियेटीव्ह विचार करणारे नाही आहेत. त्यामुळे ते काहीतरी करायला जातात व अधिक गोंधळाची परिस्थती निर्माण करतात. मग काय, सरकार सुद्धा तुमचे माझे प्रोब्लेम दूर करू शकत नाही. 


सर्व काही करून झाल्यावर हीच गोंधळलेली लोक मग बाबा बुवांकडे धावायला लागतात. "कुछ भी करो, बस मेरा प्रोब्लेम दूर करो मेरे लाइफ मै शांती लावो." जे या सर्व बदलांना नीट समजून घेऊ शकत आहेत ते आनंदी आहेत व जे या बदलांना समजून घेऊ शकत नाही आहेत ते प्रॉब्लेम मध्ये आहेत. ज्याला हे सातत्याने घडणारे बदल समजत नाही आहेत, त्यांचा पाया सातत्याने हलतो आहे व जे ह्या बदलाला समजून घेत आहेत, ते पूर्ण आत्मविश्वासाने याला सामोरे जात आहेत. मित्रानो हे सर्व जे घडत आहे, ते जर तुम्ही नीट समजून घेतलेत, तर त्यातून आयुष्य आनंदात जगण्याची जी संधी निर्माण होत आहे, ते तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही ते नाही समजू शकलात तर तेच तुमच्या आत्मविश्वास हलण्याचे कारण होऊ शकतात. मला दुसरा कोणीतरी येउन सांभाळेल असा जो विचार करतो तो फसतो. मला माझा बॉस सांभाळेल, माझे सरकार मला सांभाळेल …. वेगरे वेगरे. थोडक्यात पुन्हा पुन्हा आपण या सर्व समस्यांच्या मुळाकडे जर पहिले, तर आपल्याला लक्षात येईल, हे सर्व जे घडते आहे यामागे कारण आहे की, आपण बाह्य परिस्थितीवर जास्त अवलंबून आहोत. यावर मार्ग एकच आहे, तो म्हणजे आपण आपल्या स्वतामधील आत्मविश्वासला वाढविणे. आपल्या आयुष्याचा पूर्ण ताबा आपण स्वतः घेणे म्हणजेच आपण आपला स्वताचा आत्मविश्वास वाढविणे. 


कोणावरही अवलंबून राहू नका, तक्रार करत बसू नका. जे नेहमी तक्रार करतात, ते काहीच निर्माण करू शकत नाही व जे निर्माण करतात, ते कधीच तक्रार करत नाहीत. तुम्हाला जर अधिक आनंदी व यशस्वी व्हावयाचे असेल तर तुम्हाला अवलंबून राहणे सोडून, स्वावलंबन स्वीकारावे लागेल. आजच्या नंतर मला जे हवे ते मला मिळवण्यासाठी जे ज्ञान आवश्यक आहे ते मला मिळवावेच लागेल. मला माझी प्रवृत्ती बदलावीच लागेल. 


- उल्हास कोटकर

9821033736




No comments: