ध्येयातून प्रेरणा निर्माण करा. (SMART Goals)

कोणते ध्येय तुमच्यासमोर आहे? हा प्रश्ने बहुतेकांना गडबडीत टाकतो. एकतर या प्रश्नानचा विचार कुणी केलेला नसतो. किंवा केलाही असेल तरी तो वरवरचा असतो; तसेच काही जण जेव्हा त्यांची ध्येये बोलून दाखवतात, तेव्हा ती त्यांनाच आणखी गोंधळात टाकणारी असतात. त्या ध्येयांना काही मोजमाप, दिशा व कालांतर नसते. 


जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो, तेव्हा कुठे जायचे ते ठिकाण, लागणारा वेळ, काय साध्य करायचे आहे, या सगळ्या विचारानिशी व तयारीनिशी बाहेर पडतो. हे जसे आपण दैनंदिन जीवनात प्रत्येक गोष्टीत करतो व हे करणे आवश्याक आहे हेही पटते, तर मग आयुष्याच्या वाटचालीतही हा विचार व ही तयारी करायला नको का? 


घरातून कुठल्याही उद्दिष्टाशिवाय आपण बाहेर पडलो तर व कुठे जायचे हे न ठरवताच बाहेर पडलो, तर साहजिकच आपण भरकटू. आपला हा प्रवास दिशाहीन, अर्थहीन होईल. आयुष्याच्या बाबतीतही नेमके हेच घडते. उद्दिष्टाशिवाय, ध्येयाशिवाय, कुठलेही नेमके ठिकाण डोळ्यांसमोर न ठेवता, बहुतेकांचा प्रवास सुरू असतो. साहजिकच अनेकजण भरकटताना दिसतात. 


एक प्रवासी फिरता फिरता गावाच्या वेशीपाशी येतो. तेथून त्याला तीन-चार रस्ते दिसतात. बाजूलाच एका पारावर साधू बसलेला असतो. एका रस्त्याकडे बोट दाखवून तो प्रवासी त्या साधूला विचारतो, "हा रस्ता कुठे जातो?' साधू प्रवाशाला विचारतो, "तुला कुठे जायचे आहे?' प्रवासी म्हणतो, "मला माहीत नाही.' त्यावर साधू सांगतो, "...मग कुठलाही रस्ता तुला तेथे घेऊन जाईल.' 


आयुष्याला वळण लावायचे झाले, तर ध्येय हवे. ध्येय डोळ्यासमोर असल्यावर माणसाच्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो, एक निश्चित दिशा मिळते. हीच दिशा आपल्याला हेतू देते. हेतू समोर असल्यामुळे कामात, कामावर लक्ष केंद्रित व्हायला मदत होते. आपण भरकटत नाही. वेळ वाया जात नाही. ही ध्येयनिश्चिती स्वखुशीने असावी, आवडीची, गरजेची व स्वत:च्या कुवतीशी सांगड घालणारी असावी. मग बघा, आपल्या हातून कसे अजुबे घडतात ते. ध्येयनिश्चिती म्हणजेच ‘स्पेसिफिक’. ध्येय निश्चित करताना ते ‘मेझरेबल’ म्हणजेच मोजमाप करता येण्याजोगे आहे ना, याची खातरजमा करणे आवश्यक. त्या ध्येयासाठी असणारे वेगवेगळे मापदंड माहीत असावेत म्हणजेच ध्येयपूर्तीच्या मार्गावरचे अजून किती मैलाचे दगड आपल्याला पार करायचे आहेत, ध्येयापासून आपण किती लांब आहोत हे कळते.


ध्येय नेहमीच ‘अचीव्हेबल’ म्हणजे साध्य करण्याजोगे असावे. स्वत:च्या आकलन क्षमतेपेक्षा, सामर्थ्यापेक्षा ते जास्त नसावे. आपली बौद्धिक, शारीरिक, मानसिक कुवत लक्षात घेऊन ध्येय आखावे. त्रयस्थ दृष्टीने स्वत:च्या कुवतींचा विचार करावा. ‘रिअलिस्टिक’ म्हणजे वास्तववादी. ध्येय व्यवहाराला धरून आहे ना, साध्य करण्याजोगे आहे ना, उगीच वल्गना करून हवेत बाण मारलेले नाहीत ना, स्वत:च्या ध्येयाला आपण गवसणी घालू शकू ना, असे ध्येयाला केंद्रबिंदू मानून 360 अंशांनी त्याचा विचार करायला हवा.


‘टाइम बाउंड’ म्हणजे कालमर्यादा नियोजित ध्येय. ध्येयपूर्तीसाठी किती काळ लागेल, हा विचारही फार आवश्यक. ही कालमर्यादा फार महत्त्वाची. नाहीतर ध्येयाप्रती असलेली तुमची जबाबदारी, आपली वचनबद्धता रंग उडाल्यासारखी होऊन जाते. जोपर्यंत आपण ध्येयपूर्तीचा काळ नियोजित करत नाही, तोपर्यंत सुरुवातही जोमाने होत नाही.


आजच आपल्या ध्येयपूर्तीच्या प्रवासाची सुरवात करा. ध्येय निश्‍चित करा व सुस्पष्टपणे मांडा. हे काम उद्यावर ढकलू नका. "उद्या' काही आपल्या जीवनात येत नसतो. ध्येयातून प्रेरणा निर्माण करा. आयुष्य उजळून टाका. यशस्वी व्हा. 


शेवटी फक्त इतकेच म्हणायचे आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो …. 


हा यही रस्ता है तेरा, तुने अब जाना है. हा यही सपना है तेरा, तुने पहचाना है. तुझे अब ये दिखाना है रोके तुझे आन्धीया, या जमीन या आसमान पायेगा जो लक्ष्य है तेरा लक्ष्य तो हर हाल मै पाना है .


- उल्हास कोटकर

9821033736





No comments: