स्वप्न लिहून ठेवा, लिहिली नसतील तर लिहायला सुरवात करा.

तुम्हा आम्हा सर्वांमध्ये दडलेला एक वृक्ष आहे. त्याला आकाशचं निमंत्रण, पावसाची साथ आणि वाऱ्याची साद मिळली ना तर त्याचे वृक्षात रुपांतर व्हायला वेळ लागणार नाही. चला मोठे होऊया मनाने, चला मोठे होऊया विचाराने, चला मोठे होऊया कर्तुत्वाने …. पण असे मोठे होताना जीवन नुसतेच भरायचे म्हणून भरू नका. म्हणजे काय, हे मी स्वतः समजून घेताना, एक गोष्ट मला इथे यावेळी आठवली. 


एकदा एक माणूस तहानेने व्याकूळ होवून मेला. पाण्याचा एकही थेंब पिऊ न शकल्याने अखेर त्याचा अंत झाला. तो असं काय करत होता? तर तो आपल्या घरातच पाणी भरत होता. मोठ मोठी भांडी भरून झाली. कळशी, टोप, पातेली, वाट्या, पेले, चमचे सरते शेवटी चाळण आणि गाळणीसुद्धा भरण्याचा प्रयत्न झाला. त्या एवढ्या धावपळीत त्याला स्वतःला तहान लागली पण पाण्याच्या हव्यासापोटी तो भरलेल्या पाण्यापैकी पाणी प्यायला तयार नव्हता आणि त्याची अखेर झाली. असेच नुसते जीवन भरण्याचा हव्यास नको.


उतूंग शिखरावर जायचं ना … तर मग स्वप्न बघा. उद्याचं सत्य हे आजचं स्वप्नच असतं हे लक्षात घ्या. स्वप्न तुमच्या मनातले, स्वप्न तुमच्या विचारातले …. ते पुन्हा पुन्हा पहायला शिका. पांघरूण घेऊन झोपला असाल तर ते दूर करा. खिडकी उघडा. 


मी कसा दिसेन ही काळजी नको तर मी कसा असेन याची काळजी घ्या. देवाने माणसं ही झेरॉक्स प्रमाणे एकसारखी जन्माला घातलेली नाहीत. पं. रवी शंकर, डॉ.अब्दूल कालाम हे जसे एकमेवाद्वीतीय तसेच आपल्या सारखे आपणच. प्रत्येक माणूस हा युनिक आहे आणि म्हणूनच एकमेव आहे, तीच खरी ताकद आहे. 


दुसऱ्यांपासून प्रेरणा घ्या मात्र भरारी घेणारे पंख तुमचेच असू द्या. 


जो पोहायला शिकवतो त्याने हात पाय मारून तुम्हाला मला पोहता येणार नसते. 


पोहायला शिकवतो त्यालाच मिठी मारू नका दोघेही बुडण्याची शक्यता असते. 


स्वप्न पहिलीत तर काहीही शक्य आहे. आता हेच बघा ना, एका पथ्थराला स्वप्न पडत की आपण सागर व्हावं. हो हो हो … एका पथ्थराला सुद्धा स्वप्न पडत…. अहो पथ्थराला पाझर फुटला की, त्याचा ओहळ होतो, पुढे तो नदीला मिळतो, नदी सागराला मिळाली की तेव्हाच तो पथ्थर सागर होतो. 


एक पथ्थर पर्वतावरून असा उतरतो मग तुम्ही आम्ही तर चालती बोलती माणसं. नदी सारखे नेहमी वाहते रहा… अडथळे येऊ देत, काटेकुटे येऊ देत …. तरी, वाट काढून वाहते रहा. एका जागेवर थांबनाऱ्याला अडथळा कसा येणार? 


सरपटणाऱ्या माणसांना कोसळण्याची भिती नसते. 

तेव्हा आपण का कोसळत नाही याचा विचार करा.


आपल्या आजूबाजूला पुर्वीसारखे रोल मॉडेल्स दिसत नाहीत म्हणण्यापेक्षा तुम्ही आम्ही होऊया ना रोल मॉडेल्स असा विचार करा. हा विचार जर हरवलाय तर तो शोधूया. जगण्याची कला आत्मसात करूया. आणे वाला पल, जाने वाला है … या येणाऱ्या वेळेचे महत्व जो जाणतो, तोच त्याच्या प्रत्येक क्षणाची दिवाळी करतो. आजच्या छोट्या छोट्या यशामध्ये, छोट्या छोट्या दुखामध्ये नुसतेच गुंतून राहू नका, उद्याच्या स्वप्नांची काळजी घ्या. 


स्वप्न लिहून ठेवा, लिहिली नसतील तर लिहायला सुरवात करा … त्यावर बोलायला सुरवात करा. अनेक जण आपली स्वप्न पूर्ण करत आहेत... तुम्ही आम्ही पण त्यातले होऊया.


- उल्हास कोटकर

9821033736




1 comment:

Unknown said...

खूप छान सर
Thank you so much🙏