ध्येय निश्चिती ( गोल सेटिंग कसे करावे? )

धनुष्यातून बाण सोडण्यासाठी जसे एक निशाण लागते, तसेच आयुष्याला दिशा देण्यासाठी एक लक्ष्य लागते. ध्येय निश्चिती म्हणजे आपल्या भविष्याचे स्पष्ट चित्र मनात रेखाटणे, अतिशय बारकाईने ते कागदावर उतरविणे. आता ते सत्यात उतरविण्याकरता कधी कधी दिवस, आठवडे, महिने व वर्ष लागू शकतात. कारण त्यासाठी व्यवस्थित प्लानिंग, वेगवान निर्णयक्षमता, रिसर्च व महत्वाचे म्हणजे न थकता कृती करावी लागते. 

ध्येय लिहिणे हे एखाद्या सिनेमाचे स्क्रिप्ट लिहिण्यासारखे आहे. तर तुमच्या ध्येयाचे हे स्क्रिप्ट कसे बनवावे? पुढीलप्रमाणे ... 

--------------

स्टेप १ – स्वतःचे ध्येय ठरवा. 

तुमच्या स्वप्नांची यादी तयार करा. तुम्हाला काय करायला आवडेल, अनुभवयाला आवडेल, काय बनायला आवडेल, काय मिळवायला आवडेल? जे काही मनात येते ते सर्व लिहून काढा. सर्व स्वप्ने / ध्येय लिहून काढा.  उदा. : शिक्षण-करियर, आरोग्य, व्यवसाय-प्रोफेशन, मानवी स्नेहसंबंध, स्वतःचा व्यक्तिमत्व विकास, बौद्धिक-मानसिक विकास, मौजमजा-प्रवास, सामाजिक बांधिलकी. 

स्वतःला प्रश्न विचारा, मला ही स्वप्ने का साकार करायची आहेत? तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी जर जबरदस्त कारण तुमच्याकडे असेल, तरच ते आहे तुमचे  ध्येय. तुमचे “का?” चे उत्तर जितके जबरदस्त तितकेच तुमचे ध्येय अधिक सुस्पष्ट बनते.  

--------------

स्टेप २ – ध्येय नेमकं व मोजमापासहीत स्पष्ट करा. 

तुम्हाला पाहीजे ते मिळविण्यासाठी, पहीली पायरी म्हणजे तुम्हाला नेमकं काय पाहीजे आहे ते माहीती असणे. अनेकदा लोक म्हणतात कि त्यांना यशस्वी व्हायचं आहे, पण त्यांना जर विचारलेत की, म्हणजे नेमकं काय? तर काही जणांचे उत्तर असते पुढील प्रमाणे …  

उदा. : नक्की काय ते अजून माहीत नाही, मला खूप सुखी व्हायचे आहे, मला खुप पैसा कमवायचा आहे, मला माझे सर्व प्रॉब्लेम्स दूर करायचे आहेत.
जो पर्यंत आपल्याला आपले ध्येयंच माहीत नाही तो पर्यंत आपल्याकडील क्षमतेचा, वेळेचा व इतर साधन सामुग्रीचा वापर कसा करावा हेच आपल्याला कळणार नाही. 

यशस्वी माणसांचा हा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म असतो की, त्यांना नेमकं काय पाहीजे आहे ते माहिती असते. त्यांची ध्येयं निश्चित व नेमके असतात आणि म्हणूनच ते आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रयत्नशील असतात. 

--------------

स्टेप ३ - तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कराव्या लागणाऱ्या गोष्टींची यादी तयार करा. 

उदा. १ : कोणते ज्ञान लागेल, कोणती कौशल्य लागतील, कोणता अनुभव घ्यावा लागेल, कोणते शिक्षण घ्यावे लागेल, कोणती माणसे जोडावी लागतील?

उदा. २ : आत्मविश्वास किती लागेल, किती वेळ लागेल, किती पैसे लागतील, कोणकोणती साधनसामुग्री लागतील, नवीन कोणते तंत्रज्ञान लागेल.  

--------------

स्टेप ४ - तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमच्या व्यक्तीमत्वात कोणते बदल करावे लागतील याचा अभ्यास करा व त्याची यादी करा. 

तुमच्या समोर असलेल्या सर्व आव्हानांची यादी तयार करा. उदा. : काही सवयी, ज्ञानाचा अभाव, अनुभव नसणे, कौशल्य नसणे, प्रवृत्तीचा अभाव. आता या प्रत्येक आव्हानांचे रुपांतर प्रश्नांमद्धे करा व त्यावर उत्तरे शोधा. 

--------------

स्टेप ५ – रिसर्च करा / संशोधन करा. 

आदर्श व्यक्तींची यादी तयार करा व त्यांना भेटून त्यांनी त्यांचे ध्येय कसे साध्य केले याचा अभ्यास करा. 

तुम्ही जे ठरवले आहे व ठरवण्याचा विचार करत आहात, त्या क्षेत्रातील ध्येय गाठलेल्या तज्ञांची भेट घ्या. तज्ञांना भेटून नेमके काय प्रश्न विचारायचे याची प्रश्नावली तयार करा. तज्ञांना भेटून काय बोलायचे आहे याची स्क्रिप्ट तयार करा व त्या स्क्रिप्टचा सराव करून त्यांना भेटायला जा. तुम्हाला हवी असलेली नेमकी उत्तरे कशी मिळतील याचा विचार करा. 

अधिक रिसर्च कसा करावा?

- पुस्तके, इंटरनेट ही माध्यमे रिसर्च करण्यासाठी व माहिती मिळविण्याचे उत्तम मार्ग आहेत. 

- करियर मार्गदर्शक व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण संस्था हे देखील उत्तम माध्यम आहे. 

- टीव्ही वरील अनेक कार्यकम आहेत जे याबद्दल उपयुक्त अशी माहिती देतात.

- अनेक सभा सम्मेलन अशी असतात जिथे यशस्वी व्यक्तिमत्वांना आमंत्रित केली जातात व त्यांची प्रेरणादायी व्याख्याने आयोजित केली जातात, ते कार्यक्रम जाऊन पहा, त्यात सहभाग घ्या.  

--------------

स्टेप ६ - कृतीचा प्लान तयार करा. 

कृतीचा प्लान तयार करणे, म्हणजे तुमचे ध्येयं साध्य करण्यासठी कराव्या लागणार्‍या कृतींची क्रमवार मांडणी करणे. उदाहरणार्थः जर तुम्हाला मुंबई  ते पुणे  प्रवास करायचा असेल तर तुम्हाला ट्रेन जायचे, बस ने जायचे कि स्वतःचे वाहन घेऊन जायचे हे ठरवावे लागेल. तुम्हाला खर्च किती येईल व तुम्हाला किती करायचा आहे हे ठरवावे लागेल. तुम्हाला नेमका किती वेळ लागेल व किती वेळाने तुम्ही कुठे पोहचाल हे माहित करून घ्यावे लागेल. 

जर तुम्ही ट्रेनने जायचे ठरवले तर तुम्हाला आधी सी.एस.टी. अथवा दादर स्टेशनवर येउन तिकीट काढावे  लागेल मग प्लॅट्फॉर्म वर जावं लागेल. ट्रेन पकडावी लागेल व पुणे स्टेशनवर उतरावं लागेल. याला म्हणतात क्रमवार कृती, थोडक्यात कृतीचा प्लान तयार करणे.

--------------

स्टेप ७ - कृती करा. 

काही करण्याची प्रेरणा होते तोच उचीत मुहूर्त. कृतीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे चालढकल करणं! बर्‍याच माणसांना ठाऊक असतं की, आपण काय केलं पाहिजे परंतु ते कृती करण्यासाठी चालढकल करत असतात. चालढकल करण्यामागची बरीच कारणं आहेत. प्रमुख कारण भीती हेच असलं तरी आळशीपणा हादेखील कृतीच्या आड येत असतो. 

लक्षात ठेवा, कृती केल्यानेच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, कृतीमुळेच भिती नाहीशी होते आणि कृतीमुळेच परिणाम साध्य होतात. म्हणूनच आत्ता ह्या क्षणाचा मुहूर्त टाळू नका! 

--------------

स्टेप ८ - कृती आराखड्यात योग्य बदल करणे व नवीन कृती करणे.

जेव्हा आपण कृती करतो तेव्हा दोन गोष्टी घडतात,  एक - तुम्ही ध्येयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करता किंवा ध्येय साध्य करता आणि दोन - तुम्हाला अपेक्षित परिणाम साध्य होत नाहीत, काहीतरी अनपेक्षीत घडतं. आपल्यातील बरीच लोकं याला 'अपयश' असं म्हणतात! तुमचा जेवढा कृतीवर भर जास्त तेवढे अपयशाचे प्रमाण जास्त आणि माणूस जेवढा यशस्वी, त्याच्या आयुष्यात अपयशाचे प्रमाण तेवढेच जास्त.

--------------

स्टेप ९ - अपयशाचा सामना कसा कराल. 

पर्याय १: कारण देणे, आरोप प्रत्यारोप करणे व सोडून देणे.

पर्याय २: पुन्हा पुन्हा तीच कृती करणे. 

 वरील दोन्ही पर्याय वापरू नका.  पर्याय ३ वापरा. 

पर्याय ३: अपयशातून शिकणे, कृती आराखड्यात योग्य बदल करणे व नवीन कृती करणे.

जेव्हा आपणास यश मिळत नाही तेव्हा आपल्याला त्यातुन नवीन काहीतरी शिकले पाहीजे. आपल्या प्रयत्नांमध्ये बदल केले पाहीजेत. थॉमस एडिसनने वीजेच्या बल्बचा शोध लावण्यासठी एकूण १०,००० वेळा प्रयत्न केले. जेव्हा त्याला या बाबत विचारण्यात आलं तेव्हा त्याचं म्हणणं होतं की 'प्रत्येक अयशस्वी प्रयत्नानंतर मी माझ्या पध्द्तीमध्ये बदल केला व माझे ध्येयं साध्य झाले. पहील्या ९,९९९ प्रयत्नातुन मी बल्ब कसा बनविला जात नाही, हे शिकलो!'


उल्हास कोटकर 
9821033736




2 comments:

Nehal Shinde said...

Fantastic

Nehal Shinde said...
This comment has been removed by the author.